शनिवार, २० जून, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-8

एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.
दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल.
पाली, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी प्राकृत भाषांपासून मराठीचा उद्भव झाला, असं जेव्हा तज्ज्ञ म्हणतात तेव्हा पुरावे म्हणून या भाषांचे आज मराठीत अस्तित्वात असलेले अवशेष पुढे केले जातात. मात्र कोणत्याही एका प्राकृत भाषेतून मराठीचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्राकृतोद्भव व प्राकृतिकोद्भव म्हणून ज्या काही आधुनिक, वर्तमानकालीन बोली आहेत, त्यांपैकी सिंधी, गुजराती, हिंदी किंवा बंगाली यांसारख्या बोली व मराठी यांत फरक आहे. शौरसेनीपासून हिंदी, अपभ्रंशापासून सिंधी व गुजराती, मागधीपासून बंगाली अशा या भाषांचा उद्भव मध्ययुगीन प्राकृत भाषांपासून झाला, असं म्हणता येतं. अमक्या एका भाषेपासून दुसरी भाषा तयार झाली असं म्हणताना जी भाषा उत्पन्न झाली तिने मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्वच्या सर्व सांगाडा उचलला, हे सिद्ध करावं लागतं. बंगालीने मागधीचं सर्व व्याकरणतंत्र जसंच्या तसं उचललं आहे. त्याचप्रमाणे शौरसेनीचं व्याकरणतंत्र हिंदीनं उचललं आहे. तोच प्रकार सिंधी, गुजराती आणि अपभ्रंश-आभीरांच्या भाषांचा आहे. परंतु मराठी भाषेनं संपूर्ण सांगाडा माहाराष्ट्रीपासून किंवा अपभ्रंशापासून तंतोतंत घेतला, असं दाखवता येत नाही. मराठी भाषेत बराचसा भाग हा अपभ्रंश व माहाराष्ट्रीपासून आलेला आहे. मराठीतील नामविभक्तींचा भाग हा अपभ्रंश भाषेपासून आलेला आहे, तर आख्यातविभक्तींचा भाग, म्हणजे क्रियापदांचे प्रत्यय वगैरे, माहाराष्ट्रीपासून घेतलेला दिसतो. मात्र याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे इतर काही प्राकृत भाषांच्या लकबी मराठीत सामावलेल्या दिसून येतात.
प्राकृत भाषांपैकी आद्य असलेल्या पाली भाषेचे काही अवशेष मराठीत सापडतात. काही शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रूपांतरं पालीमध्ये जी आढळतात, तीच मराठीत आलेली आहेत. तिण (तृण), पाऊस (प्रावृष्), पिळणे (पीडनं), छकडा (शकट), गूळ (गुड), अस्वल (ऋच्छमल्ल) इत्यादी पाली भाषेचा स्पष्ट शिक्का असलेले शब्द मराठीत रूढ आहेत. दुसरी गोष्ट पाली भातील 'ळ'कारासंबंधी. पाली भाषेत 'ळ'कार ही एक विशेष बाब आहे. 'ळ' हा वर्ण पाली-पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांमध्ये नाही. 'ळ'कार संस्कृत भाषेत नाही, पण वैदिक भाषेत आहे. तिथूनच तो पाली भाषेत आला असावा. 'ळ'कार हा मूर्धन्य वर्ण असल्यानं इतर मूर्धन्य वर्ण जसे द्राविडी भाषेच्या संपर्कानं आर्यभाषेत शिरले, तसा 'ळ' हा वर्णही त्यांच्या बरोबर द्राविडी भाषेतून शिरला असावा. शिष्ट मराठी भाषेत या 'ळ'काराच्या उच्चाराचं तसं बरंच स्तोम आहे. नळ, डाळिंब, ओंजळ, सावळा, सळई, आळे, फळे, काजळ, मिळणे इत्यादी अनेक संस्कृतोद्भव शब्दांत 'ळ'चा वापर केला जातो. जळ, कमळ, सकळ इत्यादी शब्दांत तो वैकल्पिक आहे. या शब्दांत 'ल'चा वापरही केला जातो. कित्येक शब्दांत 'ल'काराऐवजी 'ळ'कार घातल्यास अर्थ सर्वस्वी बदलतो. म्हणजे ते स्वतंत्र अर्थाचे निराळेच शब्द होतात. उदा. चूल, चूळ; बोल, बोळ; गाल, गाळ; नील, नीळ; वेल, वेळ इत्यादी. जुन्या पेशवाईकाळच्या मराठी लिखाणांत 'ल' हाच जास्त प्रचारात होता. त्या काळी 'ळ' दाखवण्यासाठी 'ल'च्या मागे एक 'त्'कार जोडत असत. 'त्ल' हे चिन्ह 'ळ'बद्दल वापरत असत.
पैशाची भाषेतील जी लकब मराठी भाषेत राहिली ती 'ण' व 'न' यासंबंधी होय. पैशाचीशिवाय इतर प्राकृत भाषांत 'ण'कार आहे, परंतु 'न'कार नाही. उलट पैशाचीत 'न'कार आहे, पण 'ण'कार मुळीच नाही. पैशाची भाषेची ही लकब मराठीतही बर्‍याच वेळी दिसून येते. उदा. ऊन (उष्ण), तहान (तृष्णा), कान (कर्ण), रान (अरण्य), जानवे (यज्ञोपवीत), विनंती (विण्णतिआ), सुने (सुण्ण) इत्यादी पुष्कळ शब्दांत संस्कृतातील अथवा प्राकृतांतील 'ण'काराऐवजी 'न'कारच मराठीत वापरला गेला आहे.
मागधी या प्राकृत भाषेनंही मराठीत आपल्या खुणा ठेवल्या आहेत. मागधी भाषेचा एक विशेष असा की, 'र'कार व 'स'कार या दोहोंबद्दल 'ल'कार व 'श'कार हे अनुक्रमे येतात. तसंच संस्कृत 'स्थ' अगर 'र्थ' या जोडवर्णाबद्दल मागधीत 'त्थ' येतो. तसंच 'ष्ट'चा 'स्ट' होतो. यांपैकी बरेच प्रकार ग्रामीण मराठीत रूढ आहेतच, परंतु शहरी मराठीतही हे प्रयोग आढळतात. उदा. ओशाळणे (अपसर), मिसळ (मिश्र), घोळतो (घूर्णते), जोशी (जोइसी), केशर (केसर), पेलणे (प्रेरनम्).
अर्धमागधीचे बरेच विशेष मराठीत आढळून येतात. अर्धमागधी आणि माहाराष्ट्री या दोन्ही भाषा पुष्कळ अंशी सारख्या स्वरूपाच्या असल्यानं अर्धमागधीचे जे विशेष मराठीत आढळतात ते माहाराष्ट्रीच्या विशेषांशीही जुळतात. जो प्रांत मराठीनं सध्या व्यापला आहे, त्यात जैनधर्मीयांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी बराच प्रयत्न केला. जैनधर्मीयांची धर्मभाषा अर्धमागधी असल्यानं मराठीच्या स्वरूपावर अर्धमागधीचाही प्रभाव जाणवतो. दीर्घ स्वर र्‍हस्व करणे, मृदु व्यंजने कठोर करणे इत्यादी लकबी अर्धमागधीतून मराठीत आल्या आहेत.
माहाराष्ट्री भाषेचं बरंच ऋण मराठीनं घेतलं आहे. अनेक शतकं ही बोली ग्रांथिक भाषा म्हणून प्रचलित होती, तेव्हा अशा शिष्टसंमत भाषेचा ठसा मराठीवर उमटणं साहजिकच आहे. अकारान्त नपुंसकलिंगी नामं जशी माहाराष्ट्रीत लिंग बदलत नाहीत तशी मराठीतही बदलत नाहीत. मराठीतला द्वितीयेचा 'स' हा प्रत्यय माहाराष्ट्रीतल्या षष्टीचतुर्थीच्या 'स्स' या प्रत्ययावरून आला आहे. उदा. हत्तीस < हत्तिस्स, आगीस < अग्गिस्स. माहाराष्ट्रीतल्या आख्यातविभक्तीतले बरेच प्रकार मराठीत जसेच्या तसे उतरले आहेत. काळ व अर्थ यांचे प्रत्यय मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतले आहेत. मराठीतल्या कर् या धातूची भविष्यकाळाची रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांवरून कशी आली आहेत, हे खालील उदाहरणांवरून कळेल.
१. करिस्सामि > करिहिमी > करिइइं > करी + ल = करीन
२. करिस्सामो > करिहिमो >करिहिमु>करिइउं > करउं > करूं + ल > करून >करू
इच्छार्थक धातुही मराठीत माहाराष्ट्रीतून आले आहेत.
'मी' या सर्वनामाच्या बाबतीत मराठीतली सर्व रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांशी जुळतात. एकवचनाची रूपं - उदा. अहम्मि, अम्मि, म्मि > मी, महाहिंतो . मजहुनि, मज्झ>मज, मेज्च्चअ > माझं.
अनेकवचनाची रूपं - उदा. अम्हे>आम्ही, अह्मसुंतो > आह्माहुनी, अह्म > आह्मां, अम्हेसुं > आम्हांत
तारतम्याचा गुण मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतला आहे. नामे व्यंजनान्त न ठेवता स्वरान्त ठेवण्याची प्रवृत्ती माहाराष्ट्री व अपभ्रंश या दोन्हींमध्ये आहे. तीच मराठीनं उचलली. विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची ठेवण्याची जी प्रवृत्ती संस्कृत, माहाराष्ट्री, अपभ्रंश यांमध्ये दिसते, तीच बरेचदा मराठीतही दिसते. मराठीतल्या काही शब्दांची लिंगे माहाराष्ट्री व अपभ्रंश भाषेतील लिंगांप्रमाणे आहेत. उदा. पाऊस, जन्म, सरा, नयन हे पुल्लिंगी, आणि अंजली, गाठ हे स्त्रीलिंगी.
अपभ्रंशातूनही अनेक विशेष मराठीत आले. अपभ्रंश ही आभीरांची भाषा होती. आभीर सिंध प्रांतातून कोकणात व विदर्भात येऊन स्थायिक झाले होते, व त्यामुळे अपभ्रंशाचे बरेच अवशेष मराठीत सहज सापडतात. (डॉ. गुणे व डॉ. वि. भि. कोलते यांच्या मते तर अपभ्रंशापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. ) नामाला लागणारे विभक्तींचे प्रत्यय मराठीनं अपभ्रंशापासून घेतले आहेत. सर्व विभक्तीप्रत्यय अपभ्रंशोत्पन्न आहेत. भाववाचक नामं तयार करण्यासाठी अपभ्रंश भाषेत प्पण हा प्रत्यय वापरला जातो. तोच मराठीनं उचलला आहे. अपभ्रंशाप्रमाणे मराठीतही आधी नामाचं सामान्यरूप होऊन नंतर विभक्तीचे प्रत्यय लागतात. मराठी व वर्तमानातील इतर बोलींतील काव्यात अन्त्ययमकाचं प्राबल्य दिसून येतं. हे अन्त्ययमक अपभ्रंश भाषेतून आलं आहे. अपभ्रंश भाषेतलं सर्व पद्यवाङ्मय अन्त्ययमकयुक्त आहे. संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांत हा प्रकार नाही. त्याचप्रमाणे अपभ्रंश भाषेतील छंदांचे काही प्रकारही मराठीनं घेतले आहेत.
प्राकृत भाषांप्रमाणेच संस्कृत भाषेचाही जबरदस्त प्रभाव मराठीवर पडला आहे. ऋ, ॠ, ऐ, औ हे वर्ण संस्कृतात व मराठीत आहेत, प्राकृतात नाहीत. ङ्, ञ् ही दोन अनुनासिके संस्कृतात आहेत, प्राकृतांत नाहीत. मराठीत ती संस्कृतातूनच आली आहेत. संस्कृत शब्द तर मराठीत अमाप आहेत. तद्भव शब्दांचा भरणा आहेच. परंतु तत्सम शब्दंही कमी नाहीत. प्राकृत भाषांत तत्सम शब्द नाहीत.
पूर्ववैदिक, संस्कृत, प्राकृत आणि मराठी ही अवस्थांतरं कशी झाली, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं.
marathi.jpg
संस्कृत बोलणार्‍या आर्यांनी जेते म्हणून वसाहत केली, त्यावेळी इथल्या मूळ रहिवाशांनी आपली भाषा सोडून जेत्यांची संस्कृत भाषा उचलण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे चार प्राकृत भाषा तयार झाल्या. या उत्पत्तीचा काळ इ. पू. ६००-७०० असा धरता येईल. पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषा बोलली जात होती. बुद्धाच्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्रात माहाराष्ट्री, पूर्वेकडे मागधी, मध्यप्रदेशात शौरसेनी आणि उत्तरेत पैशाची अशा या भाषा निर्माण झाल्या. या भाषा केवळ संस्कृतातून तयार झाल्या. त्यांचा वर्णोच्चार नरम होता आणि व्याकरणही अधिक सोपं होतं. मराठी भाषेच्या पूर्वी लोकांच्या वापरात असणार्‍या प्राकृत व अपभ्रंश या भाषांचा अस्त केव्हा झाला व मराठीचा उगम कधी झाला, हे निश्चित ठरवणं तसं कठीण आहे. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत प्रतिष्ठित ग्रंथकार व लोक लिहीत व बोलत असतात. पाली, शौरसेनी, माहाराष्ट्री वगैरे प्राकृत भाषा लोकमान्य होत असताना पाणिनीय संस्कृत भाषा प्रतिष्टित लोकांत प्रचलित होती. अपभ्रंश भाषा प्रचलित होत असताना ग्रंथकार मात्र प्राकृत भाषेत लिहीत असत, आणि आधुनिक बोलीचा जन्म झाल्यावरदेखील पुष्कळ वर्षं अपभ्रंश व प्राकृत भाषांत ग्रंथ लिहिले जात असत. अपभ्रंश भाषेत तर इ. स. १२००पर्यंत उत्तम प्रकारची व पुढे १५०० सालापर्यंत थोडी ग्रंथरचना झाली आहे. तेव्हा पूर्वी प्रचारात असलेल्या भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी जन्मास येण्यापूर्वी अमुक एक विशिष्ट प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती, असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रीय समाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रीय समाज तयार झाला, व त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. शौरसेनी बोलणारे राष्ट्रिक लोक, मागधी व माहाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रिक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणापासून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा तयार झाली. मराठी भाषा प्रत्यक्ष जन्मण्यापूर्वीच्या संधिकालात एक दोन शतकं एखादी मिश्र प्राकृत किंवा मिश्र अपभ्रंश प्रचारात असावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा