सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती



 महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-3

कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक - पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.
टोलेमी हा कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो -
१. सौराष्ट्र - उत्तर गुजरात
२. लारीके - लाट, दक्षिण गुजरात
३. आरिआके = मराठा देश
४. दामरिके = दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश .
यांपैकी तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे पुन्हा तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग येतो. दुसरा भाग उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भाग दक्षिण कोकण. या भागांना अनुक्रमे १. Arisake Proper २. Sadan's Ariake ३. Pirate Ariake असं तो म्हणतो.
विदर्भ - अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की, विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.
विदर्भास वर्‍हाड असंही म्हणतात. वर्‍हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्‍हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: - कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्‍हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.
या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे                                                               क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा