शनिवार, २० जून, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-8

एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.
दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल.
पाली, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी प्राकृत भाषांपासून मराठीचा उद्भव झाला, असं जेव्हा तज्ज्ञ म्हणतात तेव्हा पुरावे म्हणून या भाषांचे आज मराठीत अस्तित्वात असलेले अवशेष पुढे केले जातात. मात्र कोणत्याही एका प्राकृत भाषेतून मराठीचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्राकृतोद्भव व प्राकृतिकोद्भव म्हणून ज्या काही आधुनिक, वर्तमानकालीन बोली आहेत, त्यांपैकी सिंधी, गुजराती, हिंदी किंवा बंगाली यांसारख्या बोली व मराठी यांत फरक आहे. शौरसेनीपासून हिंदी, अपभ्रंशापासून सिंधी व गुजराती, मागधीपासून बंगाली अशा या भाषांचा उद्भव मध्ययुगीन प्राकृत भाषांपासून झाला, असं म्हणता येतं. अमक्या एका भाषेपासून दुसरी भाषा तयार झाली असं म्हणताना जी भाषा उत्पन्न झाली तिने मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्वच्या सर्व सांगाडा उचलला, हे सिद्ध करावं लागतं. बंगालीने मागधीचं सर्व व्याकरणतंत्र जसंच्या तसं उचललं आहे. त्याचप्रमाणे शौरसेनीचं व्याकरणतंत्र हिंदीनं उचललं आहे. तोच प्रकार सिंधी, गुजराती आणि अपभ्रंश-आभीरांच्या भाषांचा आहे. परंतु मराठी भाषेनं संपूर्ण सांगाडा माहाराष्ट्रीपासून किंवा अपभ्रंशापासून तंतोतंत घेतला, असं दाखवता येत नाही. मराठी भाषेत बराचसा भाग हा अपभ्रंश व माहाराष्ट्रीपासून आलेला आहे. मराठीतील नामविभक्तींचा भाग हा अपभ्रंश भाषेपासून आलेला आहे, तर आख्यातविभक्तींचा भाग, म्हणजे क्रियापदांचे प्रत्यय वगैरे, माहाराष्ट्रीपासून घेतलेला दिसतो. मात्र याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे इतर काही प्राकृत भाषांच्या लकबी मराठीत सामावलेल्या दिसून येतात.
प्राकृत भाषांपैकी आद्य असलेल्या पाली भाषेचे काही अवशेष मराठीत सापडतात. काही शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रूपांतरं पालीमध्ये जी आढळतात, तीच मराठीत आलेली आहेत. तिण (तृण), पाऊस (प्रावृष्), पिळणे (पीडनं), छकडा (शकट), गूळ (गुड), अस्वल (ऋच्छमल्ल) इत्यादी पाली भाषेचा स्पष्ट शिक्का असलेले शब्द मराठीत रूढ आहेत. दुसरी गोष्ट पाली भातील 'ळ'कारासंबंधी. पाली भाषेत 'ळ'कार ही एक विशेष बाब आहे. 'ळ' हा वर्ण पाली-पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांमध्ये नाही. 'ळ'कार संस्कृत भाषेत नाही, पण वैदिक भाषेत आहे. तिथूनच तो पाली भाषेत आला असावा. 'ळ'कार हा मूर्धन्य वर्ण असल्यानं इतर मूर्धन्य वर्ण जसे द्राविडी भाषेच्या संपर्कानं आर्यभाषेत शिरले, तसा 'ळ' हा वर्णही त्यांच्या बरोबर द्राविडी भाषेतून शिरला असावा. शिष्ट मराठी भाषेत या 'ळ'काराच्या उच्चाराचं तसं बरंच स्तोम आहे. नळ, डाळिंब, ओंजळ, सावळा, सळई, आळे, फळे, काजळ, मिळणे इत्यादी अनेक संस्कृतोद्भव शब्दांत 'ळ'चा वापर केला जातो. जळ, कमळ, सकळ इत्यादी शब्दांत तो वैकल्पिक आहे. या शब्दांत 'ल'चा वापरही केला जातो. कित्येक शब्दांत 'ल'काराऐवजी 'ळ'कार घातल्यास अर्थ सर्वस्वी बदलतो. म्हणजे ते स्वतंत्र अर्थाचे निराळेच शब्द होतात. उदा. चूल, चूळ; बोल, बोळ; गाल, गाळ; नील, नीळ; वेल, वेळ इत्यादी. जुन्या पेशवाईकाळच्या मराठी लिखाणांत 'ल' हाच जास्त प्रचारात होता. त्या काळी 'ळ' दाखवण्यासाठी 'ल'च्या मागे एक 'त्'कार जोडत असत. 'त्ल' हे चिन्ह 'ळ'बद्दल वापरत असत.
पैशाची भाषेतील जी लकब मराठी भाषेत राहिली ती 'ण' व 'न' यासंबंधी होय. पैशाचीशिवाय इतर प्राकृत भाषांत 'ण'कार आहे, परंतु 'न'कार नाही. उलट पैशाचीत 'न'कार आहे, पण 'ण'कार मुळीच नाही. पैशाची भाषेची ही लकब मराठीतही बर्‍याच वेळी दिसून येते. उदा. ऊन (उष्ण), तहान (तृष्णा), कान (कर्ण), रान (अरण्य), जानवे (यज्ञोपवीत), विनंती (विण्णतिआ), सुने (सुण्ण) इत्यादी पुष्कळ शब्दांत संस्कृतातील अथवा प्राकृतांतील 'ण'काराऐवजी 'न'कारच मराठीत वापरला गेला आहे.
मागधी या प्राकृत भाषेनंही मराठीत आपल्या खुणा ठेवल्या आहेत. मागधी भाषेचा एक विशेष असा की, 'र'कार व 'स'कार या दोहोंबद्दल 'ल'कार व 'श'कार हे अनुक्रमे येतात. तसंच संस्कृत 'स्थ' अगर 'र्थ' या जोडवर्णाबद्दल मागधीत 'त्थ' येतो. तसंच 'ष्ट'चा 'स्ट' होतो. यांपैकी बरेच प्रकार ग्रामीण मराठीत रूढ आहेतच, परंतु शहरी मराठीतही हे प्रयोग आढळतात. उदा. ओशाळणे (अपसर), मिसळ (मिश्र), घोळतो (घूर्णते), जोशी (जोइसी), केशर (केसर), पेलणे (प्रेरनम्).
अर्धमागधीचे बरेच विशेष मराठीत आढळून येतात. अर्धमागधी आणि माहाराष्ट्री या दोन्ही भाषा पुष्कळ अंशी सारख्या स्वरूपाच्या असल्यानं अर्धमागधीचे जे विशेष मराठीत आढळतात ते माहाराष्ट्रीच्या विशेषांशीही जुळतात. जो प्रांत मराठीनं सध्या व्यापला आहे, त्यात जैनधर्मीयांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी बराच प्रयत्न केला. जैनधर्मीयांची धर्मभाषा अर्धमागधी असल्यानं मराठीच्या स्वरूपावर अर्धमागधीचाही प्रभाव जाणवतो. दीर्घ स्वर र्‍हस्व करणे, मृदु व्यंजने कठोर करणे इत्यादी लकबी अर्धमागधीतून मराठीत आल्या आहेत.
माहाराष्ट्री भाषेचं बरंच ऋण मराठीनं घेतलं आहे. अनेक शतकं ही बोली ग्रांथिक भाषा म्हणून प्रचलित होती, तेव्हा अशा शिष्टसंमत भाषेचा ठसा मराठीवर उमटणं साहजिकच आहे. अकारान्त नपुंसकलिंगी नामं जशी माहाराष्ट्रीत लिंग बदलत नाहीत तशी मराठीतही बदलत नाहीत. मराठीतला द्वितीयेचा 'स' हा प्रत्यय माहाराष्ट्रीतल्या षष्टीचतुर्थीच्या 'स्स' या प्रत्ययावरून आला आहे. उदा. हत्तीस < हत्तिस्स, आगीस < अग्गिस्स. माहाराष्ट्रीतल्या आख्यातविभक्तीतले बरेच प्रकार मराठीत जसेच्या तसे उतरले आहेत. काळ व अर्थ यांचे प्रत्यय मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतले आहेत. मराठीतल्या कर् या धातूची भविष्यकाळाची रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांवरून कशी आली आहेत, हे खालील उदाहरणांवरून कळेल.
१. करिस्सामि > करिहिमी > करिइइं > करी + ल = करीन
२. करिस्सामो > करिहिमो >करिहिमु>करिइउं > करउं > करूं + ल > करून >करू
इच्छार्थक धातुही मराठीत माहाराष्ट्रीतून आले आहेत.
'मी' या सर्वनामाच्या बाबतीत मराठीतली सर्व रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांशी जुळतात. एकवचनाची रूपं - उदा. अहम्मि, अम्मि, म्मि > मी, महाहिंतो . मजहुनि, मज्झ>मज, मेज्च्चअ > माझं.
अनेकवचनाची रूपं - उदा. अम्हे>आम्ही, अह्मसुंतो > आह्माहुनी, अह्म > आह्मां, अम्हेसुं > आम्हांत
तारतम्याचा गुण मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतला आहे. नामे व्यंजनान्त न ठेवता स्वरान्त ठेवण्याची प्रवृत्ती माहाराष्ट्री व अपभ्रंश या दोन्हींमध्ये आहे. तीच मराठीनं उचलली. विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची ठेवण्याची जी प्रवृत्ती संस्कृत, माहाराष्ट्री, अपभ्रंश यांमध्ये दिसते, तीच बरेचदा मराठीतही दिसते. मराठीतल्या काही शब्दांची लिंगे माहाराष्ट्री व अपभ्रंश भाषेतील लिंगांप्रमाणे आहेत. उदा. पाऊस, जन्म, सरा, नयन हे पुल्लिंगी, आणि अंजली, गाठ हे स्त्रीलिंगी.
अपभ्रंशातूनही अनेक विशेष मराठीत आले. अपभ्रंश ही आभीरांची भाषा होती. आभीर सिंध प्रांतातून कोकणात व विदर्भात येऊन स्थायिक झाले होते, व त्यामुळे अपभ्रंशाचे बरेच अवशेष मराठीत सहज सापडतात. (डॉ. गुणे व डॉ. वि. भि. कोलते यांच्या मते तर अपभ्रंशापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. ) नामाला लागणारे विभक्तींचे प्रत्यय मराठीनं अपभ्रंशापासून घेतले आहेत. सर्व विभक्तीप्रत्यय अपभ्रंशोत्पन्न आहेत. भाववाचक नामं तयार करण्यासाठी अपभ्रंश भाषेत प्पण हा प्रत्यय वापरला जातो. तोच मराठीनं उचलला आहे. अपभ्रंशाप्रमाणे मराठीतही आधी नामाचं सामान्यरूप होऊन नंतर विभक्तीचे प्रत्यय लागतात. मराठी व वर्तमानातील इतर बोलींतील काव्यात अन्त्ययमकाचं प्राबल्य दिसून येतं. हे अन्त्ययमक अपभ्रंश भाषेतून आलं आहे. अपभ्रंश भाषेतलं सर्व पद्यवाङ्मय अन्त्ययमकयुक्त आहे. संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांत हा प्रकार नाही. त्याचप्रमाणे अपभ्रंश भाषेतील छंदांचे काही प्रकारही मराठीनं घेतले आहेत.
प्राकृत भाषांप्रमाणेच संस्कृत भाषेचाही जबरदस्त प्रभाव मराठीवर पडला आहे. ऋ, ॠ, ऐ, औ हे वर्ण संस्कृतात व मराठीत आहेत, प्राकृतात नाहीत. ङ्, ञ् ही दोन अनुनासिके संस्कृतात आहेत, प्राकृतांत नाहीत. मराठीत ती संस्कृतातूनच आली आहेत. संस्कृत शब्द तर मराठीत अमाप आहेत. तद्भव शब्दांचा भरणा आहेच. परंतु तत्सम शब्दंही कमी नाहीत. प्राकृत भाषांत तत्सम शब्द नाहीत.
पूर्ववैदिक, संस्कृत, प्राकृत आणि मराठी ही अवस्थांतरं कशी झाली, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं.
marathi.jpg
संस्कृत बोलणार्‍या आर्यांनी जेते म्हणून वसाहत केली, त्यावेळी इथल्या मूळ रहिवाशांनी आपली भाषा सोडून जेत्यांची संस्कृत भाषा उचलण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे चार प्राकृत भाषा तयार झाल्या. या उत्पत्तीचा काळ इ. पू. ६००-७०० असा धरता येईल. पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषा बोलली जात होती. बुद्धाच्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्रात माहाराष्ट्री, पूर्वेकडे मागधी, मध्यप्रदेशात शौरसेनी आणि उत्तरेत पैशाची अशा या भाषा निर्माण झाल्या. या भाषा केवळ संस्कृतातून तयार झाल्या. त्यांचा वर्णोच्चार नरम होता आणि व्याकरणही अधिक सोपं होतं. मराठी भाषेच्या पूर्वी लोकांच्या वापरात असणार्‍या प्राकृत व अपभ्रंश या भाषांचा अस्त केव्हा झाला व मराठीचा उगम कधी झाला, हे निश्चित ठरवणं तसं कठीण आहे. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत प्रतिष्ठित ग्रंथकार व लोक लिहीत व बोलत असतात. पाली, शौरसेनी, माहाराष्ट्री वगैरे प्राकृत भाषा लोकमान्य होत असताना पाणिनीय संस्कृत भाषा प्रतिष्टित लोकांत प्रचलित होती. अपभ्रंश भाषा प्रचलित होत असताना ग्रंथकार मात्र प्राकृत भाषेत लिहीत असत, आणि आधुनिक बोलीचा जन्म झाल्यावरदेखील पुष्कळ वर्षं अपभ्रंश व प्राकृत भाषांत ग्रंथ लिहिले जात असत. अपभ्रंश भाषेत तर इ. स. १२००पर्यंत उत्तम प्रकारची व पुढे १५०० सालापर्यंत थोडी ग्रंथरचना झाली आहे. तेव्हा पूर्वी प्रचारात असलेल्या भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी जन्मास येण्यापूर्वी अमुक एक विशिष्ट प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती, असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रीय समाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रीय समाज तयार झाला, व त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. शौरसेनी बोलणारे राष्ट्रिक लोक, मागधी व माहाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रिक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणापासून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा तयार झाली. मराठी भाषा प्रत्यक्ष जन्मण्यापूर्वीच्या संधिकालात एक दोन शतकं एखादी मिश्र प्राकृत किंवा मिश्र अपभ्रंश प्रचारात असावी.

शनिवार, २३ मे, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-7

satavahana.jpg
सातवाहनांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
मौर्यांच्यानंतर ख्रिस्तपूर्व एक दोन शतकांपासून ख्रिस्तोत्तर दोन शतकांपर्यंत सातवाहन अथवा आंध्रभृत्य या राजांचा अंमल महाराष्ट्रावर होता. हे घराणे सनातनी होते की अन्यधर्मीय परके होते यासंबंधी मतभेद आहेत. इतिहासाचार्य राजवाडे त्यांना हिंदुधर्माचे कट्टर पुरस्कर्ते मानतात. ते अळूची भाजी व भात खाणारे, त्यांच्या रथाच्या बैलांचे कान फाडलेले आणि आंध्र राजांचे सेवक म्हणवणारे असे होते, अशा अर्थाची काही अनुमाने राजवाडे यांनी सातवाहनांसंबंधी राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत काढली आहेत. महाराष्ट्रावर राज्य करणारे महाराष्ट्रीय घराणे हे पहिलेच, हे नक्की. राजसत्तेसाठी या घराण्यात व खड्गाराट घराण्यात बर्‍याच चकमकी झाल्या. नहपाण खड्गाराटाने सातवाहनांचा पराभव केल्याचा उल्लेख नाशिक व कार्ले इथल्या शिलालेखांत आहे. परंतु पुढे लगेच सातवाहन गौतमीपुत्र आणि पुलयामी या दोघांनी खड्गाराटाचा पराभव करून आपला प्रदेश पुन्हा काबीज केला. काही काळाने गौतमीपुत्राचा पराभव माळव्याच्या रुद्रदामन् या क्षत्रप राजाने केला व अशा रीतीने सातवाहनांची राजवट संपली.
सातवाहनांनंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे ख्रिस्तोत्तर तिसर्‍या शतकाच्या मध्यापासूनच राज्य करत असल्याचा दाखला कान्हेरी येथील शिलालेखांवरून मिळतो. या राजांची सत्ता आपल्या नावाचा राजशक सुरू करण्याइतकी मजबूत झाली होती. त्रैकुटकांचा शक इ. स. २४९पासून सुरू होतो.
त्रैकुटकांनंतर महाराष्ट्रावर सार्वभौमत्व वाकाटक राजांनी गाजवले. यांच्या साम्राज्यात सर्व महाराष्ट्र व शिवाय उत्तरेकडील काही प्रांत येत असे. यांच्याच राजवटीत उत्तरेकडील सम्राट समुद्रगुप्ताने दक्षिणेत स्वारी केली. कालिदासाने आपल्या रघुवंशात रघूने केलेल्या स्वारीचे वर्णन या समुद्रगुप्ताच्या स्वारीचेच आहे की काय, अशी विद्वानांना शंका आहे. समुद्रगुप्ताच्या या स्वारीचं वर्णन एका शिलालेखात आहे. त्यात एरंडपल्लीचा दमन आणि देवराष्ट्राचा कुबेर या दोन राजांचा त्याने पराभव केल्याचा उल्लेख आहे. एरंडपल्ली म्हणजे खानदेशातील एरंडोल व देवराष्ट्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील (तासगाव तालुका) देवराष्ट्र ही गावे होत. देवराष्ट्राजवळच जे शंकराचं स्थान आहे, त्याला सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर असं म्हणतात. यावरून समुद्रगुप्ताच्या नावाचा याच्याशी संबंध असावा. काही विद्वानांच्या मते एरंडपल्ली व देवराष्ट्र ही दोन्ही स्थळं महाराष्ट्रात नसून तामिळनाडूत आहेत.
chalukya_0.jpg
चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
वाकाटकांनंतर कलचूरी घराण्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. या घराण्याने त्रैकूटकांचा राजशक सुरू केला होता. त्यावरून कदाचित हे घराणे त्यांच्यापैकीच असावं, असं वाटतं. कलचूरींचा पराभव मंगलीश नावाच्या चालुक्याने करून चालुक्यांची सत्ता जी महाराष्ट्रात स्थापन केली ती निर्वेधपणे इ. स. ७५३पर्यंत मोठ्या भरभराटीने चालली. चालुक्यांचा अंमल ९९,००० गावांवर व महाराष्ट्राच्या तीन विभागांवर होता, अशा मजकुराचा एक शिलालेख आहे.
rashtrakuta.jpg
राष्ट्रकुटांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
मध्ये काही काळ चालुक्यांवर गंडांतर येऊन त्यांना राष्ट्रकूटांकडून पराजय पत्करावा लागला होता. राष्ट्रकूट घराण्यांपैकी एकोणीस राजांनी इ. स. ७५३पासून ९७४पर्यंत मराठवाड्यात असलेल्या मान्यखेट (मालखेड) इथे अविच्छिन्न सत्ता गाजवली. या वंशातील दुसरा कर्क या राजाचा चालुक्यवंशीय तैलप नावाच्या राजानं पराभव करून आपली गमावलेली सत्ता पुन्हा दीडशे - सव्वादोनशे वर्षांनंतर मिळवली. चालुक्यांच्या मोठ्या साम्राज्यात काही मांडलिक राजे होते. या मांडलिकांपैकी सेउणदेशीय मांडलिक आणि माळव्याचा भोज यांच्यात चकमकी झाल्या. शेवटी सेउणचंद्राने चालुक्यसत्ता कायम केली. चालुक्यांचा अंमल इ. स. ११८९पर्यंत निर्वेध चालला. पुढे शेवटचा सोमेश्वर मरण पावल्यावर त्याचे मांडलिक आपआपसांत भांडून आपल्या जागीच प्रबळ झाले व मध्यवर्ती चालुक्यसत्तेचा नाश झाला.
चालुक्यांनंतर यादवांची राजवट सुरू झाली. यांचा मुख्य प्रस्थापक भिल्लम नावाचा राजा होता. यादव घराण्याच्या शाखा दोन. एक दक्षिणेकडील द्वारसमुद्राची शाखा आणि दुसरी उत्तरेकडील देवगड-देवगिरीची शाखा. या दोन्ही शाखा आपआपसांत भांडत असत. शेवटी भांडणात देवगिरीचा सिंधण राजा विजयी झाला व त्याच्याच वंशाने पुढे चौदाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य केलं. इ. स. ११८९पासून ते १३१२पर्यंतच्या काळात यादवांच्या कुळात एकंदर सात राजे झाले. मराठा धर्म, मराठी भाषा, मराठी वाङ्मय यांच्या दृष्टीनं यादवांची राजवट ही उल्लेखनीय आहे. यादवांच्या राजवटीत मराठी भाषा व वाङ्मय यांचा आरंभ व परिपोष झपाट्याने झाला. यादवांचं राज्य सुरळीत चालयामुळे संत, संन्यासी, कवी अव्वल दर्जाचं काव्य निर्माण करू शकले. कृष्ण, महादेव व रामदेव या राजांच्या काळात प्रजेला भरपूर संपन्नता लाभली. पण दुर्दैवानं महमदीयांची नजर दक्षिणेकडे वळली व अल्लाउद्दिनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या झुंडी येऊन यादवांची राजवट लयाला गेली. शेवटी मलीक काफ़ूराने शंकरदेव यादव याला ठार मारून यादव सत्तेचा अंत केला.
महाराष्ट्रातील वसाहतीचा व राजसत्तेचा हा इतिहास. उत्तरेकडून दक्षिणेत जे लोक आले ते वेगवेगळ्या प्रांतांतून आले आणि येताना आपल्या भाषा घेऊन आले. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी वगैरे भाषा अशा प्रकारे महाराष्ट्रात आल्या. या सर्व भाषांच्या खुणा आज मराठीत सापडतात. पण मराठीची उत्पत्ती झाली कशी?
kalpesh1.JPG
अगदी जुन्या भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा तसा वादग्रस्त व अनेक दृष्टींनी अनिश्चित असा विषय आहे. संस्कृत, फारसी, लॅटीन या भाषा कशा निर्माण झाल्या, किंवा द्राविड भाषा किंवा चिनी भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा विषय आपण सोडून देऊ. पण अलीकडच्या काळात एक भाषा नष्ट होऊन नवी भाषा कशी व का उत्पन्न होते, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीपासून आतापर्यंत मराठी भाषेच्या स्वरूपात काळानुसार थोडा फरक होत गेला आहे. परंतु भाषा एक असून तिला आपण मराठी असंच म्हणतो. ही मराठी भाषा ज्ञानेश्वरांपूर्वी उत्पन्न झाली आणि पूर्वी इथे प्रचलित असलेली महाराष्ट्री भाषा मृत झाली. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली याचा विचार करत असताना ती तशी का उत्पन्न झाली, हा विचारही करावा लागतो. मूळात नवीन भाषा तयार का होतात?
कोणत्याही भाषेला तिचे बोलीचे स्वरूप जाऊन साहित्यिक स्वरूप प्राप्त झालं म्हणजे ती स्वत: नाहिशी होऊन इतर भाषांचा जन्म होतो, असा सिद्धांत काही भाषातज्ज्ञ मांडतात व त्याला आधार आर्यभाषांचा देतात. वैदिक संस्कृतापासून ज्या वेळी साहित्यिक भाषा तयार झाली त्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या व बोली म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली. या प्राकृत भाषा ज्या वेळी साहित्यिक भाषा म्हणून साच्यांत जाऊन बसल्या त्या वेळी बोली म्हणून त्यांनी गाजवलेले वर्चस्व अपभ्रंश भाषेने आपल्याकडे घेतलं. पुढे काळाच्या ओघात या अपभ्रंश भाषेनं साहित्यिक भा्षेचं स्थान मिळवलं आणि सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी या बोली म्हणून उदयास आल्या, असा एक सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत फारसा पटत नाही. एखाद्या भाषेच्या उद्भवास तिच्या पूर्वभाषेचं साहित्यिक स्वरूप जर कारणीभूत असेल, तर हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी या आधुनिक भाषांना सध्या साहित्यिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्या मरून त्यांच्यापासून नवीन भाषांनी जन्म घ्यायला हवा होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही. मराठी भाषा तर गेली अनेक शतकं साहित्यिक भाषा म्हणून टिकून आहे आणि असं असूनही तिचा विकासच होतो आहे. कोणतीही भाषा साहित्यिक होणं हे तिच्या उत्कर्षाचं गमक आहे, तिच्या अवनतीचं नव्हे आणि तिच्या नाशाच तर नव्हेच नव्हे. उलट साहित्यिक भाषेचं कायमचं न बदलणारं स्वरूपच तिच्यापासून दुसरी भाषा उत्पन्न होण्यास विरोध करतं. बोली जशी परिवर्तनशील असते तशी साहित्यिक भाषा असत नाही. परिवर्तनशील बोलीपासूनच दुसरी भाषा निर्माण होणं अधिक शक्य आहे. तेव्हा नवीन भाषा तयार होण्याचं कारण भाषेचं साहित्यिक स्वरूप नसून दुसरं काही असलं पाहिजे. समाजाला धक्का बसल्याखेरीज कोणतीही भाषा बदलत नाही. लोकक्रांती, राज्यक्रांती, धर्मक्रांती वगैरेंसारखा जबर धक्का समाजाला बसल्याखेरीज भाषा बदलत नाही. आर्यभाषेच्या स्वरूपांत निरनिराळी अवस्थांतरं ज्या ज्या काळांत झाली त्या त्या काळांत अशा तर्‍हेची क्रांती झाल्याचं इतिहासावरून दिसतं. मराठीच्या उत्पत्तीच्या बाबतीत अशा प्रकारची झालेली क्रांती सांगण्यापूर्वी तिची उत्पत्ती कशी झाली, हे बघणं आवश्यक आहे.
कोणत्याही भाषेचं स्वरूप अभ्यासताना तिच्या अंतरंगाचा विचार करावा लागतो. बाह्य स्वरूपात फक्त शब्दांचाच संबंध येत असल्यामुळे त्यांचा विचार बाजूला ठेवून वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, प्रयोगप्रक्रिया इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या स्वरूपावरून जर सहज नजर फ़िरवली तर त्या प्रत्येकीच्या स्वरूपातले काही घटक मराठीत आल्याचं कळून येतं व अशाप्रकारे पूर्वीच्या निरनिराळ्या भाषांची बरीच साम्यं मराठीत आढळून येतात, आणि म्हणूनच मराठीच्या उद्गमाविषयी विद्वानांमध्ये मतभेद झालेला दिसतो. पूर्ववैदिक, पाली, अर्धमागधी, संस्कृत, अपभ्रंश, माहाराष्ट्री या सार्‍या भाषांना मराठीचं जनकत्व बहाल केलं जातं. मराठीच्या उद्गमाविषयी अशा प्रकारचं मतवैचित्र्य आहे. या प्राचीन भाषांचे अवशेष मराठीत सापडतात, हे यामागचं कारण.

रविवार, ३ मे, २०१५

किल्ला रसाळगड

किल्ला रसाळगड

     सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.
    गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
    रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते.
 वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठा मिळून सुमारे १६ तोफा आहेत

संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाडात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाडांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजाव तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत. म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठा प्रमाणावर नांदता असावा.

काही किल्ले असे असतात कि कोणत्याही मोसामांमधे  तिथे जवस वाटत. रसाळगड हा अशा किल्ल्यांपैकी एक. कोणत्याही मोसमात जा, इथला निसर्ग आपल्यला खाली हाती कधीच पाठवत नाही. खेडला पोहोचाल कि भरणानाक्यावरून एक रस्ता डावीकडे निमानिवाडी रसाळगड कडे वळतो. आता किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नवीन रस्ता झाला आहे. पहिली तिथून एक पायवाट होति.
पावसाळ्यात वाटेच्या दुतर्फा हिरवगार जंगल मध्येचं वात ओलांडताना  रानडुक्कर दिसतो. झादाझुडपांमध्ये एकमेकाशी टिवल्याबावल्या करणारे मोर दिसतात. एखाद गाव हे वाड्यांपासून बनलेलं असपेठ वाडी म्हणून एक वाडी आहे.
ता अशी आपली समजूत आहे. पण इथे रसाळगड हे सात वाड्यांपासून बनलेल आहे. आता एसटी गडाच्या पायथ्याशी जाते पुढे सुरु होतो तो तांबड्या रंगाचा रस्ता एका  बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असा हा रस्ता. मध्येच एखाद्या ओहोलच्या थंड पाण्याचा गारेगार स्पर्श पावलांना होतो. पठारावर भात लोंब्यांवर येऊ लागलेली असतात तर कुठे हलवि भातही तयार झालेली दिसतात. निमाणी गावातून एका तासात आपण एका आधुनिक पाण्याच्या टाकीजवळ येउन पोहोचतो. या खिंडीतच महीपत सुमारगडावरून येणारी वात येउन मिळते. इथून रसाळगड अगधीच थिटूकला दिसतो. गडाच्या पायथ्याशी पुढे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो.दरवाज्याच्या बाजूने एक छोटीशी वाट गेली आहे. ती वाट आपल्याला सुरुंगाच्या पाण्याच्या टाक्या जवळ पोहोचवते. पहिला दरवाजा चढून पुढे जाताच समोर हनुमानच मंदिर लागत हनुमानाच दर्शन घेऊन जाताना किल्ल्याच्या एका पायरी वर काही  विरगळ शिल्प आढळून येत. थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो.
रसाळगड नावा प्रमाणे रसाळ आहे.गडाचा घेरा ५ ते ७ एकर पेक्षा जास्त नाही. पण एवढ्याशा किल्ल्यावर १६ तोफा आहेत. दुसरा दरवाजा ओलांडून झाल्या नंतर आपण गडावर पोहोचतो. सुरुवातीलाच एक मोठी तोफ आढळून येते. पुढे गेल्यावर झोलाई वाघजाई देवीच मंदिर आहे. ह्या मंदिराच्या कोनाड्यात अनेक देव – देवतांचे मुर्त्या आढळून येतात. मंदिराच्या शेजारी एक पाण्याचा तलाव आहे, हे पाणी पिण्या योग्य आहे. तसेच तलावाच्या बाजूला गणपतीच मंदिर आहे. मंदिरच्या बाजूला बालेकिल्ल्यचा अवशेष आहे. तसेच त्यला छोटे बुरुज आहेत. ह्या किल्ल्यावर दर तीन वर्षांनी झोलाई देवीची जत्रा असते.
किल्ल्याच्या थोड पुढे गेल्यवर शंकराची पिंड आहे तसेच  नंदि आहे. किल्ल्यावर पूर्वी धान्य साठवण्या साठी धान्य कोठार तयर करण्यात आली होती ती आजीही चांगल्या अवस्थेत आहे . किल्ल्याच्या भोवती पाच पांडवांनी बांधलेले  ७ पाण्याचे टाके ( खांबटाका ) आहेत. पण यातील एकच खांबटाका पाहतो यातून कारण पुढे रस्ता खूप अवघड आहे.
१६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि  पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला आसवा.
अशाप्रकारे रसाळगड आपल्यला त्याच्या कुशीत घेऊन  मिरवत असतो. हा एक – दीड तासाचा प्रवास कधी संपतो ते देखील समजत नाही. हा ट्रेक इथेच संपत नाही. यापुढे आपण सुमारगड आणि महीपत गड देखील करता येतो.
 गडावर जाण्याच्या वाटा :
    १.खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाटावर उतरायचे. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
    २.खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
    ३.खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडावी. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.
पोहोचण्याचा मार्ग : खेड पासून रसाळगड एसटी शेवटचा थांबा.
(सकाळी आकारा वाजता , दुपारी एक वाजता, संध्याकाळी पाच वाजता, पाचची एसटी गावात वस्ती करते आणि तीच सकाळी साडे सहाला निघते. )
    राहण्याची सोय : झोलाई देवीचे मंदिर (३० ते ४० माणसे राहू शकतात.)
    जेवणाची सोय : आपण स्वतः करावी किवा  पेठ वाडी येथे ग्रामस्थाकडून खाण्याची सोय होऊ शकते.
    पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे./झोलाई देवी मंदिराच्या बाजूला असलेला  पाण्याचा टाका.

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

1 मे - महाराष्ट्र दिन


1 मे महाराष्ट्र दिन साठी प्रतिमा परिणाम





1 मे - महाराष्ट्र दिन


1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. 

महाराष्ट्र दिन साठी प्रतिमा परिणाम


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. 
प्रबोधनकार ठाकरे साठी प्रतिमा परिणाम

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.



सोमवार, २७ एप्रिल, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-6

  महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-6

f
महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविकअश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती. 

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो. 

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्‍या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्‍या व तिसर्‍या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं. 

वसाहत कायम, स्थिर झाली म्हणजे साहजिकच राजदंडाची आवश्यकता निर्माण होते. महाराष्ट्रावर पहिली सत्ता मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा आग्नेयीच्या कोपर्‍यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.
क्रमशः             

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव!

स्फूर्तिदायी ठरते.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू (मध्यप्रदेश) येथे झाला.  तत्कालीन प्रखर अशा सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट अनुभव कोरले गेले. पुढे १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.पण या परस्परविरोधी अनुभवांचा विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे मनोमन ठरवले. परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.

भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी,  त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०)  आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६)  अशी वृत्तपत्रे  चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,  ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक  असण्याबरोबरच स्वत: एक  वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.

डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता.

डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा  होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग  लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी  समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते ‘सुशिक्षित’ झाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.
डॉ.आंबेडकरांनी १९२७ ला महाडच्या (जि. रायगड)  चवदार तळयावर अस्पृश्यांनादेखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वत: डॉ.आंबेडकर जरी हिंदू देव देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने  जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, कमी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तसेच तथाकथित उच्चवर्णीय लोक आपल्या वर्तनात व मानसिकतेत बदल करत नाहीत हेही त्यांच्या लक्षात आले म्हणूनच...  १९३५ मध्ये त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला येथे केली. १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६., नागपूर.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते.
एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क, घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले.१९३० सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी  त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघांच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा  डॉ.आंबेडकर यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की आपल्या जातिबांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याच वेळी अस्पृश्यांसाठी वेगळया रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून  आपल्या जातिबांधवांचे हितदेखील पाहिले (पुणे करार). जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले, तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौध्द धर्म निवडला. धर्म परिवर्तनाच्या या कृतीतूनही त्यांचे देशप्रेम लक्षात येते.

आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात रोज १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व  चांगल्या प्रकारे ओळखून होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’  या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली.१९२७ ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबध्द असे ‘समता सैनिक दल’ स्थापन केले. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर १९४२ साली ‘अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फे डरेशन’ ची स्थापना केली. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

डॉ.आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. सामूहीक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरीत्या पुरवठा झाला, तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मत होते. पूर्वीच्या काळी खोती पध्दत अस्तित्वात होती. या खोती पध्दतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ती एक प्रकारची आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती. ही खोती पध्दत नष्ट करणारे कायदे डॉ.आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वेमार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याप्रमाणे जलमार्गावरदेखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे मत त्यांनी मांडले. पण हे मत कोणी फारसे विचारात घेतले नाही. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम झालेले  आहेत ते सर्वश्रुत आहे. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाची एक योजनादेखील त्यांनी फार आधीच मांडली होती.

१९४७ मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली.राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाबददल भारतीय जनता डॉ.आंबेडकरांना कदापिही विसरणार नाही.विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात सक्षम संघराज्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही घटना मार्गदर्शक ठरते, यावरून डॉ. आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची, बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते.  इतर पाश्चात्य देशात स्त्रियांना व गरीबांना मतदानाचा अधिकार फार उशिरा मिळाला. पण डॉ.आंबेडकरांनी प्रौढ मतदान पध्दतीचा स्वीकार देशाला स्वतंत्र झाल्यापासूनच करायला लावला व भारतीय लोकशाहीचा पायाच त्यांनी या प्रकारे भक्कम केला. प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांचे कार्य नीट करता यावे यासाठी त्यांच्या सेवाशर्ती,  नेमणूक या बाबत राज्यघटनेतच तरतूद करून त्यांना डॉ.आंबेडकरांनी निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.

‘राज्यघटनेचे शिल्पकार,’ ‘अस्पृश्योध्दारक’ असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.
आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना?  स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’

अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ येथपर्यंत झाला.

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-5

 महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-5
 
दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.
क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरल
दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.
 
क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरल
                                                                                                                                                    क्रमशः